Crime Pudhari
नागपूर

Nagpur Crime : मुलांच्या वादातून तरुणाचा खून; लोखंडी रॉडने हल्ला

वाठोड्यातील खरबी परिसरातील घटना; पती-पत्नीसह तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मुलांच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणाला हिंसक वळण लागले. लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबी येथील मानवशक्ती लेआउट परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी पती-पत्नीसह तिघांना अटक केली आहे.

शहाबाज इशाक शेख (वय ३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांमध्ये झालेल्या वादावरून शहाबाज आणि आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. त्यानंतर वाद वाढत जाऊन आरोपींनी शहाबाज यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

यावेळी दोन आरोपींनी लोखंडी रॉडने शहाबाज यांच्या डोक्यावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शहाबाज यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, २२ सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी वाहिद अन्सारी (वय ३५) याला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर फरार असलेले इमरान अन्सारी आणि त्यांची पत्नी रुबीना अन्सारी यांनाही पोलिसांनी अटक केली. मुलांच्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट तरुणाच्या मृत्यूत झाल्याने खरबी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT