नागपूर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी कायम असल्याचे चित्र युवक काँग्रेसमधील (Nagpur Youth Congress) नेता पुत्रांसह 60 पदाधिकाऱ्यांवरील कारवाईनंतर पुढे आले आहे. माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या बाहेर असल्यामुळे आंदोलनाला उपस्थित नव्हत्या. एकतर्फी कारवाईत त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आहे.
मुळात अशी तडकाफडकी पदमुक्त करण्याची कारवाई करताच येत नाही, आधी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते, असा मुद्दा या निमित्ताने माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाटील यांनी उपस्थित केला आहे. मध्य नागपुरातून विधानसभा निवडणूक लढलेले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांना देखील या आंदोलनाची कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते. या कारवाईत विशिष्ट गटाच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात आले, असाही आरोप आता केला जात आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांनी आपल्या मर्जीने ही यादी तयार केली व युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. (Nagpur Youth Congress)
एकंदरीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील गटबाजी आता या नेता पुत्रांच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीतही आलेली दिसत आहे. अर्थातच याचा फटका पक्षाला बसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजप स्वबळावर सत्तेत येण्याची स्वप्न पाहत असताना काँग्रेस, महाविकास आघाडीचे नेते मात्र आपसातच भांडताना दिसत आहेत. रविवारी सायंकाळी युवक काँग्रेसच्या बैठकीनंतर संघ मुख्यालयाला घेराव आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची स्थिती आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच राम मंदिर स्थापनेनंतर देशात स्वातंत्र्य अनुभवास आले, असे वक्तव्य केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अपमान करणारे हे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशावरून नागपुरात संघ मुख्यालय परिसरात निदर्शने करण्याच्या युवक काँग्रेसच्या या महत्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले आहे.
या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, माजी आमदार अशोक धवड यांचे सुपुत्र अभिषेक धवड, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांचे सुपुत्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह इतर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली.अशावेळी केवळ 50 - 60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या देवडीया काँग्रेस भवन येथून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली. अखेर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच रोखून धरले. आणि संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
एकंदरीत युवक काँग्रेसचे हे फसलेले आंदोलन दिल्ली दरबारी पोहोचले. त्यामुळेच तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील 60 पदाधिकाऱ्यांना पदावरून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, अनेकांना कल्पना न देता करण्यात आलेले हे आंदोलन आणि त्यानंतर जाणीवपूर्वक करण्यात आलेली पदाधिकाऱ्यांवरील कारवाई आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.