Nagpur Drug Bust Pudhari
नागपूर

Nagpur Drug Bust : नागपुरात MD ड्रग्जसह २४ वर्षीय युवकाला अटक; १६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त

आसीनगरमधील सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात मध्यरात्री पोलिसांची धाड

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानी नागपुरात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. आसीनगर परिसरात MD ड्रग्जची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या २४ वर्षीय युवकाला पाचपावली पोलिसांनी अटक केली. शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) मध्यरात्री सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपीकडून १६ ग्रॅम MD पावडर जप्त केली. साहिल अहमद फहीम उद्दीन मलिक असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या 'माया भाई'चा पोलीस शोध घेत आहेत.

आसीनगर परिसरात अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याची गोपनीय माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी पथक) मध्यरात्री सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात छापा टाकला. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या साहिल मलिक याला ताब्यात घेऊन पंचांच्या उपस्थितीत त्याची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये त्याच्याकडे MD ड्रग्ज आढळून आले.

पोलिसांनी या कारवाईत १६ ग्रॅम MD पावडरसह मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासात साहिल मलिक याला सोहेल मलिक ऊर्फ 'माया भाई' (रा. टेकावस्ती) याच्याकडून अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. तसेच अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कथित मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT