नागपूर: प्रमोद बोराडे नामक कर्मचाऱ्याचा कंपनीतील सुरक्षेच्या अभावी लोखंडी प्लेट पोटाला लागून गंभीर जखमी झाल्याने सोमवारी (दि.१९) मध्यरात्री मृत्यू झाला. यासंदर्भात नातेवाईकांनी मृतदेह थेट कंपनीसमोर आणला. नातेवाईकांनी तातडीने ठोस मदत, भरपाई खर्च देण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला.
ही घटना घडलेली ट्रुफॉर्म टेक्नो प्रॉडक्ट प्रा. ली ही कंपनी कामठी तालुक्यातील कवठा येथील आहे. प्रमोद बोराडे हा टेकाडी गावचा रहिवासी होता. त्याच्यामागे एक मुलगी , पत्नी आहे. चार दिवसापूर्वी ही घटना घडली. किरकोळ बाब समजून प्राथमिक उपचारानंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. त्रास वाढल्याने आशा हॉस्पिटलला दाखल केले. पोटात शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती खालावली आणि प्रमोदचा मृत्यू झाला.
मात्र या कामगाराला मदतीबाबत कंपनीने हात वर केले. त्याला मरायचे होते म्हणून तो आमच्या कंपनीत आला असे कंपनी मालकाने नातेवाईकांना फोनवरून सांगितले असा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी कंपनीसमोर मृतदेह आणून आक्रोश केला. यावेळी शेकडो नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते. नातेवाईकांच्या मते या कंपनीत कुठलेही सुरक्षात्मक खबरदारीसाठी साहित्य नाही. CCTV नाही. सदर कर्मचारी मागील 8 वर्षापासून कंपनीत काम करत होता असे असताना कंपनी व्यवस्थापनाने भरपाई देण्यास नकार देत हात झटकले आहेत. या प्रकरणी मृतकाचा भाऊ पुरुषोत्तम नत्थुजी बोराडे यांनी नवीन कामठी पोलिसात तक्रारही दाखल केली. उपनिरीक्षक सुरेश पठाडे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.