नागपूर - कधीकाळी पणजोबा, आजोबा वारकरी होते मग आज सुशिक्षित नातू का वारकरी होत नाहीत अशी खंत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी व्यक्त केली. सामाजिक भान जपत राज्यभरात हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून समाजमन दुरुस्तीचा निर्धार व्यक्त केला. रविवारी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे वारकरी कार्यशाळा निमित्ताने ते मार्गदर्शन करीत होते.
27 नोव्हेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात संत मुक्ताई, जनाई, बहिणाई महिला हरिपाठच्या दिंडी स्पर्धा होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या प्रचारासाठी यातून जनजागृती केली जाणार आहे. युनेस्कोनेही ज्ञानेश्वरी दोन वेळा इंग्रजीत प्रसिद्ध केली. 18 नोव्हेंबर 1943 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वश्रेष्ठ पुस्तक म्हणून तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला याकडे आवर्जून लक्ष वेधण्यात आले.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन मराठवाड्यातील दुःखी, कष्टी शेतकऱ्यांना करण्यात आले. अनेकांनी अनेक जण त्यापासून परावृत्त झाले. चांद्यापासून बांद्यापर्यंत सामाजिक भान जपत नव्या पिढीला घडविण्याचे काम केले जाणार आहे. वारकरी समाजाचा आरसा आहेत. व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन हे सामाजिक न्यायाचे काम वर्षानुवर्षे वारकरी करीत आहेत,सरकारने त्यांना भरघोस मदत करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.
पंढरपूर हे सर्वसामान्यांचे पंढरपूरच राहू द्या, काशी करू नका यावर भर दिला. किमान 10 लाख महिलांचे संघटन उभे करायचे आहे. गावागावात एकादशीला महिला दिंडी सामाजिक विषय घेऊन वार्डात दिंडी काढली जाईल या माध्यमातून संघटन मजबूत होईल. संतांचे वारसदार असल्याने चांगला समाज निर्माण झाला पाहिजे ही आपली तळमळ आहे यावर त्यांनी भर दिला. राज्यभरातून परिषदेचे जिल्हा,तालुका अध्यक्ष वारकरी संप्रदायाची मंडळी,कीर्तनकार आले होते.
तीनही मंत्र्यांनी फिरविली पाठ
राज्यकर्त्यांना आपली शक्ती, संघटन दाखविल्याशिवाय कोणीही आपल्याकडे येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या कार्यशाळेला राज्य सरकारचे तीन मंत्री येणार होते मात्र सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री पंकज भोयर या तीनही मंत्र्यांनी याकडे पाठ फिरवल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी दिसली. राज्यकर्त्यांनी वारकरी संप्रदायात तरी आपली शाखा उघडू नये असा चिमटा पाटील यांनी काढला.