नागपूर हिंसाचार, १२५० संशयितांविरोधात गुन्हे दाखल  File Photo
नागपूर

नागपूर हिंसाचार, १२५० संशयितांविरोधात गुन्हे दाखल

Nagpur Violence | ६० जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपुरातील सोमवारी झालेला हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून माहिती घेऊन पोलीसकडून संशयित आरोपींची धरपकड केली जात आहे. आतापर्यंत कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाण्यात तब्बल १२५० संशयित आरोपींविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी २०० आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून ६० जणांना अटक करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरव्या रंगाची चादर टाकून ती जाळली. त्यामुळे महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन झाले. त्यानंतर समाज माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व सायंकाळी दंगल पेटली. भालदारपुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच शंभरावर वाहनांची तोडफोड करीत पोलिसांवरदेखील दगडफेक झाली त्यात ३५ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलीस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

१०० सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

दंगलग्रस्त परिसरातील जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये दिसणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांनी गोळा केली असून ६० आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते.

विहिंपचे कार्यकर्ते पोलिसांत शरण

यासोबतच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सात ते आठ कार्यकर्ते महाल, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी केवळ एकतर्फी कारवाई करू नये अशी मागणी पुढे आल्यानंतर हे कार्यकर्ते शरण आल्याचे समजते. पोलिसांनी देखील दोन्ही बाजूने दोषींवर कारवाई केली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. नागपुरात सध्या कुठली आपल्या घटना नसली तरी पण आपण शांतता कायम असून पोलिसांची धरपकड सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT