पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर हिंसाचारामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेत १२ ते १४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. २ ते ३ नागरिकही जखमी झाले आहेत. आम्ही घटनेमागील कारण शोधून काढू. आतापर्यंत ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिला आहे. ते मुंबईत आज (दि.१८) पत्रकारांशी बोलत होते.
नागपुरातील महाल परिसरात दोन गट आमने सामने आल्याने हिंसाचाराला सुरूवात झाली. यावेळी मनपा, अग्निशमन विभागाचे १० ते १५ जवान जखमी झाले आहेत. अतिशय अरुंद अशा गल्लीबोळांचा हा महाल, भालदारपुरा, चिटणीस पार्कचा परिसर वर्दळीचा आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही, कंट्रोल रुमच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. काल दिवसभर या भागात आंदोलन, प्रति आंदोलन सुरू होते. रात्री उशिरापर्यंत स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सध्या तणावपूर्ण शांतता चिटणीस पार्क, भालदारपुरा, गांधीगेट, हंसापुरी या परिसरात आहे. दंगलसदृश्य स्थिती निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या दोन्ही बाजूच्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली. समाजकंटकांकडून विविध अफवा जोरात असून सावध राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सर्वपक्षीयांनी शांततेचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.