नागपूर: महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अपुरी आणि तुटपुंजी असून, 'मागितली भाकरी, दिली चटणी' अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतानाच वडेट्टीवार यांनी बुधवारी (दि.२४) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ही तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकारकडे नको असलेल्या गोष्टींसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीतील खडखडाट आठवतो. जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारला संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी नियम आणि निकष आठवतात, असा आरोपही त्यांनी केला. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, हातातून पीक तर गेलेच, पण जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांनी मोठा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांची माती झाली आहे, असेही ते म्हणाले. सरकारने कर्जमाफी न दिल्याने शेतकरी आधीच संकटात होता आणि आता या पावसामुळे तो पूर्णपणे संपून गेला आहे.
वडेट्टीवार यांनी सरकारला तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून, सर्व शेतकऱ्यांना निकषांपलिकडे जाऊन मदत देण्याची मागणी केली आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.