नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात भारताने पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीच्या संधी गमावल्या, औद्योगिक क्रांती ४.० ही संधी गमावून चालणार नाही. औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. खासदार औद्योगिक महोत्सवात आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य देशापुढे आणल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय एडव्हांटेज विदर्भ - 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते रविवारी रात्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ विकास महात्मे यांच्यासह आजी-माजी खासदार आमदार अनेक मान्यवर उपस्थित होते.
विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव नितीन गडकरींनी दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र, विदर्भ आघाडीवर राहील असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढवत असून यामुळे रोजगार निर्मिती होत आहे. एकूणच उपभोग आधारित विकास आणि पायाभूत आधारित विकासाने दुप्पट गतीने देश प्रगती करत असल्याचे ते म्हणाले. यात महाराष्टाने १ ट्रिलियनचे योगदान द्यावे असे आवाहन केले. एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी यंदाचा महोत्सव अनेक एमओयू आणि वैचारिक बौद्धिक देवाण घेवाण झाल्याने यशस्वी झाल्याचे सांगितले. दीड लाखावर लोकांनी भेट दिली. प्रारंभी खासदार औद्योगिक महोत्सव विषयक एक छोटा माहितीपट दाखविण्यात आला. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विजय शर्मा यांनी केले.
आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य सरकार कडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला.
श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून १०० रोजगार निर्माण होणार आहे. उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला.
ओलेक्ट्रा इव्हीचे चेअरमन के. व्ही. प्रदीप यांनी नागपुरात होऊ घातलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोसमध्ये झाला होता. ईव्ही, तंत्रज्ञ, चालकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्याची तालुका पातळीवर शिक्षण देण्याची तयारी त्यांनी दाखविली.