नागपूर: विदर्भात सध्या उन्हाचा पारा ४०°C च्या पार गेला असतानाच, निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, बुधवारी (दि. १) रात्री साडे अकरानंतर नागपूर शहराला जोरदार वादळ आणि पावसाने झोडपून काढले. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शन दुर्लभ झाले असून, रणरणत्या उन्हाऐवजी पावसाळी गारव्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
आज आणि उद्या सर्वत्र श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी महाप्रसाद, भव्य शोभायात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा, अमरावती आणि अकोला, बुलढाणा आणि वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर तसेच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ‘अलर्ट’ जारी केला आहे.
प्रशासनाचे आवाहन
वरील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अचानक येणाऱ्या वादळामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन शासन व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी व्यक्त केला तीव्र संताप
नागपूर जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी उत्पादकांचे गारपीट आणि वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये उघड्यावर ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे शेकडो पोते धान्याची ओले झाल्याने नासाडी झाली आहे. दरवेळी अशा पावसाचा या उघड्यावरील मालाला फटका बसत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीवर तीव्र शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.