Nagpur University vice chancellor post recruitment
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ कुलगुरू मिळण्याचे संकेत आहेत. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. डॉ सुभाष चौधरी यांचे आधी निलंबन आणि नंतर निधन झाल्याने कुलगुरूपद रिक्त झाले होते. दरम्यानच्या काळात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांना कुलगुरू पदाचा प्रभार देण्यात आला.
सध्या विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी घोडे चौरे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार आहे. कुलपती आणि राज्यपाल यांनी कुलगुरु निवडीसाठी समिती नेमली. या समितीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज 7 ऑगस्टपर्यंत दिलेल्या प्रारूपात ई-मेल आणि छापील स्वरूपात पाठवायचे आहेत. कोइंबतूर येथील भारतीय विद्यापीठाच्या गणित विभागातील डॉ. एस सर्वांनन हे या समितीचे नोडल ऑफिसर आहेत.