Nagpur Municipal Corporation 5000 Trees Health Survey
नागपूर : शहरातील वृक्षांचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आता माणसांप्रमाणेच झाडांचीही आरोग्य तपासणी करून त्यांचे ‘हेल्थ कार्ड’ तयार केले जाणार आहे. अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि लायडर (LiDAR) तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील सुमारे ५ हजार वृक्षांची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी (दि.१०) महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरात करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून ही अत्याधुनिक यंत्रणा नागपूर महानगरपालिकेला प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाली आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या सहकार्याने ट्रीकोटेक कंपनीचे प्रमुख वैभव राजे हा प्रकल्प राबवत आहेत.
यावेळी आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी मुंबईत या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्यात आला होता. वृक्षांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार असून, संकलित माहितीच्या विश्लेषणाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येणार आहे.
युरोपमधून आणलेल्या या अत्याधुनिक यंत्रणेमध्ये एआय आणि लायडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष सेन्सरयुक्त चारचाकी वाहन शहरात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने फिरत झाडांची माहिती संकलित करणार आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक वृक्षाची त्रिमितीय (3D) प्रतिमा तयार होईल.
संकलित माहितीच्या आधारे झाडांचे वय, उंची, प्रजाती, बुंध्याची मजबुती, रोगांचा प्रादुर्भाव, संभाव्य धोके आणि आवश्यक उपचार यांचे विश्लेषण केले जाईल. तसेच वृक्षांच्या संरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे.
या उपक्रमामुळे शहरातील वृक्षांचे अधिक प्रभावीपणे संवर्धन करता येईल, असा विश्वास महापौर निता ठाकरे यांनी व्यक्त केला. एआय आधारित प्रणालीच्या मदतीने झाडांची सद्यस्थिती, पर्यावरणीय योगदान, प्राणवायू निर्मिती, कार्बन डायऑक्साइड शोषण क्षमता, संरचनात्मक स्थैर्य आणि संभाव्य धोक्यांचे विश्लेषण केले जाईल.
वैभव राजे यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे प्रत्येक वृक्षाचे स्वतंत्र हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल. त्यामुळे झाडांच्या आरोग्याची अचूक नोंद ठेवणे, वेळेवर उपचार करणे आणि भविष्यातील संवर्धनासाठी प्रभावी नियोजन करणे शक्य होणार आहे.