file photo
नागपूर

Nagpur News : नागपुरात थरार! विवाहाला घरच्यांचा नकार; प्रेमीयुगुलाचे विष प्राशन, प्रियकराचा अंत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : लग्नकार्याला कुटुंबीयांचा विरोध असल्याने एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला असून, प्रेयसीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ही खळबळजनक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

विशाल विलास जावडे (वय २१) असे मृत प्रियकराचे नाव असून, विनीता (वय २०, नाव बदललेले आहे) असे गंभीर असलेल्या प्रेयसीचे नाव आहे. मृत विशाल हा ऑटोचालक होता.

विवाहाला होता विरोध

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून विशाल आणि विनीता यांचे प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या विवाहाला दोघांच्याही कुटुंबीयांनी या लग्नाला तीव्र नकार दिला. या नकारा मुळे दोघेही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते. रविवारी (ता. १२) दोन्ही कुटुंबांमध्ये यावरून मोठा वादही झाला होता. या वादातूनच दोघांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

शेतात जाऊन घेतले विष

सोमवारी दुपारी विशाल आणि विनीता हे दोघेही आपापल्या घरातून निघून वानाडोंगरी परिसरातील एका शेतात गेले. तेथे दोघांनीही विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच विष अंगात भिनल्याने दोघांचीही प्रकृती खालावली आणि ते शेतातच बेशुद्ध पडले.

त्याच दरम्यान एका स्थानिक नागरिकाला हे दोघे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्याने तातडीने या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.

उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू; पोलिसांची सतर्कता

माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी वेळेचा अपव्यय न करता दोघांनाही उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विशालचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे, प्रेयसी विनीता हिची प्रकृती अद्याप गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, विशालच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे काही संतप्त मित्र विनीताच्या घरावर हल्ला करण्यासाठी निघाले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT