नागपूर - राज्यात एकीकडे बहेलिया शिकाऱ्यांची धरपकड सुरू असतानाच नागपूर प्रादेशिक वनविभागाअंतर्गत खापा वनपरिक्षेत्रात वाघाची अमानुषपणे केलेली शिकार उघडकीस आली. या वाघाचे चारही पंजे, मिश्या आणि दात बेपत्ता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
खापा वनपरिक्षेाअंतर्गत नागलवाडी वनवर्तुळअंतर्गत कोरमेटा नियतक्षेत्रातील मौजा सिरोंजी हद्दीत धनगाळा नाल्यामध्ये हा वाघ पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नागलवाडीचे अधिकारी एस.डी. गडलिंगे यांना दुपारी दिली. माहिती मिळाल्यानंतर एस.डी. गडलिंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले व इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना हा वाघ मृतावस्थेत दिसून आला. घटनेची माहिती नागपूर प्रादेशिकचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी. गंगावणे यांना देण्यात आली.
या वाघाचे वय तीन ते साडेतीन वर्ष असून वाघाचे चारही पंजे, मिश्या आणि दात शिकाऱ्यानी नेल्याचे आढळून आले. परिसरातील ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीवरुन लोखंडी तार व बांबु खुंट्यांचे सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करण्याकरिता सापळा लावण्यात आल्याचे उघड झाल्याने हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. सखोल तपासासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या श्वान पथकाची मदत घेण्यात आली.
वाघाचे शवविच्छेदन सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, गोरेवाडा वन्यजीव बचाव व उपचार केंद्राचे डॉ. मयूर पावशे, पेंच व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक बरडे यांनी केले. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी. गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. आठवले, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून कुंदन हाते, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून मंदार पिंगळे तसेच स्थानिक जीवशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत ढोबळे उपस्थित होते.
मृत वाघांच्या शवविच्छेदनादरम्यान व्हिसेरा नमुने गोळा करण्यात आले. नागपूर येथील विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून घटनास्थळी आढळलेल्या साहित्य व यापूर्वी वन्यजीव गुन्ह्यातील आरोपींच्या आधारे शिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.