नागपूर : शहरातील तुळशीनगर आणि शांतीनगर परिसरातून लुटण्यात आलेल्या पावणेचार कोटी रुपयांच्या रोकडप्रकरणी नागपूर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्याचे धागेदोरे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील डोरली गावाशी जोडले गेले असून पोलिसांनी एका आरोपीला सोबत नेऊन शेतात कडब्याच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेली तीन पोती रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची चर्चा असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
१८ नोव्हेंबरच्या रात्री तुळशी नगरमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी व्यापारी सुरेश परमार यांच्या कर्मचाऱ्यांकडून ३.७५ कोटी रुपये असलेली कार लुटली होती. दरोडेखोरांनी कार कामठी रोडवरील खैरी परिसरात सोडून पळ काढला. सीसीटीव्ही आणि टोलनाक्यावरील फुटेजवरून आरोपी मध्य प्रदेशच्या दिशेने पळाल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सकाळी नागपूर गुन्हे शाखेचे पथक एका आरोपीला घेऊन डोरली गावात पोहोचले. चार दिवसांपूर्वी परिचिताच्या शेतात कडब्याखाली लपवलेली रोकड भरलेली तिन्ही पोती जप्त करण्यात आली. जप्त केलेली रोकड डोरली ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आली असून गुन्हे शाखेचे पथक नोटांची मोजणी करत आहे.
इतर गुन्ह्यांचाही संशय
व्यापाऱ्याची ३.७५ कोटी रुपयांची रोकड लुटल्याची तक्रार होती; मात्र प्रत्यक्ष जप्त केलेली रक्कम त्यापेक्षा जास्त (४ कोटींहून अधिक) असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या टोळीने इतर ठिकाणीही दरोडे किंवा लुटीचे गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आहे.