Nagpur MD Drugs Seizure Pudhari
नागपूर

Nagpur MD Drugs Seizure : नागपुरात २१ ग्रॅम MD ड्रग्जसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

३ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, अन्य दोघांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या NDPS पथकाने मोठी कारवाई केली. MD ड्रग्जची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे सुमारे चार तास राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २१ ग्रॅम MD ड्रग्ज, तीन मोबाईल फोन आणि एक मोपेड असा एकूण ३ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात आणखी दोन संशयितांचा सहभाग समोर आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू नंदनवन परिसरातील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर MD ड्रग्जची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती NDPS पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचला. यावेळी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २१ ग्रॅम MD पावडर आढळून आली. या अमली पदार्थाची किंमत ६३ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत हसनबाग येथील शेख समीर शेख शब्बीर (वय २१), टिमकी येथील शेख माज अब्दुल सत्तार (वय २१) आणि वृंदावन नगर, नंदनवन येथील इशांत नबी शेख (वय १९) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हसनबाग येथील शहानवाज शब्बीर शेख (वय २४) आणि सुमारे ५० वर्षीय कमरुनिसा अंसारी या दोघांची नावेही तपासात समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले अमली पदार्थ नेमके कुठून आणले जात होते, त्यांचा पुरवठादार कोण आहे आणि या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT