नागपूर, पुढारी वृत्तसेवा : 1991 च्या पुरानंतर पुनर्वसन तयार होवूनही थडीपवनी येथील नागरिकांनी नविन वस्तीमध्ये जाण्यास नकार दिला. या भागाचे आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी 2007 मध्ये जुन्याच वस्तीमध्ये सर्व नागरिक राहत असल्याने या पुर्नवसनास स्थगिती दिली असतानाही महसुल विभागाने थडीपवनी येथील नागरिकांना 7 दिवसांत घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी सलील देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांना घेराव घातला. निवेदन देत 2007 च्या शासन निर्णयाची अंबलबजावणी करण्याची मागणी केली. (Nagpur News)
1991 मध्ये आलेल्या महापुरात थडपवनी येथील काही घरे वाहुन गेली होती. असे असतानाही शासनाने संपुर्ण गावाचे पुर्नवसन केले. ज्यांची घरे वाहुन गेली ते नविन पुनर्वसीत गावात गेले. परंतु ज्यांची घर वाहुन गेली नाही, ते जुन्याच गावात राहत आहेत. दरम्यान, विकास कामात अथडळे येत असल्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्व. बंडोपंत उमरकर यांनी ही बाब अनिल देशमुख यांच्या लक्षात आणून दिली होती. या संदर्भात 2007 ला मंत्रायल महसुल मंत्री यांच्यासोबत अनिल देशमुख यांनी बैठक लावली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ज्यांना पुर्नवसन मध्ये राहण्यास जायचे नाही. ते जुन्याच गावात राहु शकतात आणि त्यांना शासनाच्या सर्वच योजनेचा लाभ देण्यात यावा, असा आदेश 24 मे 2007 ला काढला होता, असे सलील देशमुख यांनी सांगीतले.
असे असताना थडपवनी येथील गावातील नागरीकांना अचानक सात दिवसात घरे खाली करण्याची नोटीस तहसीलदार नरखेड यांनी नुकतीच काढली. याविषयीची माहिती या भागाचे माजी पंचायत समिती सदस्य मयुर उमरकर यांना दिली. त्यांनी तातडीने सर्व नागरिकांना घेऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. आता ते बैठक लावणार असल्याची माहिती सलील देशमुख यांनी यावेळी दिली. सलील देशमुख यांच्यासोबत यावेळी मयुर उमरकर, थडीपवनीच्या सरपंच निलीमा उमरकर, लिलाधर ठाकरे, संतोष होले, विजय पालीवाल,योगेश धावडे, दिलीप तिजारे, लता पोतदार, शालू गायनेर, नानाजी सोनुले आदी उपस्थित होते.
काही राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी प्रशासनावर दबाव टाकून नागरिकांची घरे हिसकावण्याचे काम करीत आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही निवदेन दिले आहे. यावर योग्य तो निर्णय झाला नाही. तर भविष्यात रत्यावरची लढाई सुध्दा लढण्याची तयारी आमची असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.