नागपूर : विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा तांत्रिक आहे. त्याबाबत काय मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा करत आहोत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होऊनही मंत्र्यांना खातेवाटप झाले नाही. किमान गृहखाते कुणाकडे आहे हे तरी कळायला हवे, या शब्दात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सरकारला घेरले.
इतके राक्षसी बहुमत मिळाले असताना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या निवडीला वेळ लागला. आता खातेवाटपात विलंब होतो आहे. यानंतर निधीच्या वाटपाचे मुद्दे उपस्थित होतील. मंत्री झालेले आणि न झालेले असे अनेक लोक तर नागपुरातून गायबच झाले आहेत. ही अशी अदृश्य शक्ती नको, जे काही व्हायचे ते डोळ्यांदेखत व्हावे, अशी टोलेबाजी देखील आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.
ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यास आमचा विरोध आहे. आम्ही जिंकलो तेव्हाही आम्ही हा मतपत्रिकांच्या आधारेच निवडणुका घेण्याचा मुद्दा मांडला. ईव्हीएमच्या संदर्भात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. आम्हाला व्हीव्हीपॅट मोजण्याची परवानगी मिळावी. ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर लोकसभेत आधी ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले आणि नंतर अध्यक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला लावले. जो अधिकार खासदारांना आहे तो अधिकार देशातील संपूर्ण जनतेला मिळायला हवा, याकडे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर किंवा शत्रुत्व असे काहीही नाही. जे चांगले असेल त्याचे आम्ही समर्थन करू आणि जे चुकीचे असेल त्यावर टीका करू. आम्ही विरोधी पक्ष म्हणून अत्यंत प्रगल्भतेने काम करू, अशी भूमिका मांडली. सकारात्मक वातावरणात आणि शत्रुता न मानता विधिमंडळाचे कामकाज झाले तर महाराष्ट्राच्या जनतेची चांगली सेवा होऊ शकते,असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.