Nagpur Tea Dispute Murder Pudhari
नागपूर

Nagpur Crime: 10 रुपयांच्या चहासाठी जीव घेतला! नागपुरात चहाच्या बिलावरून संतापलेल्या दुकानदाराने ग्राहकाचा गळा चिरला

Nagpur Tea Dispute Murder: नागपुरात अवघ्या 10 रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची चाकूने हत्या करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Tea Dispute Murder: नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 10 रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची चाकूने हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी दुपारी कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहारे पेट्रोल पंपाजवळ घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव मनोज विश्वनाथ यादव असे असून तो सजावटीचे साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनाचा चालक होता. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनोज यादव आणि चहाविक्रेता कैलास गणवीर यांच्यात 10 रुपयांच्या चहाच्या बिलावरून वाद झाला होता.

वाद वाढत गेल्यानंतर कैलास गणवीर याने संतापाच्या भरात चाकू काढून मनोजच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात मनोज गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास गणवीर हा पानटपरी चालवत असून त्याच ठिकाणी चहाचीही विक्री करतो. रविवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून बाचाबाची झाली. काही क्षणांतच हा किरकोळ वाद वाढला.

घटनेची माहिती मिळताच कपिल नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हा वाद केवळ 10 रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झाला होता की त्यामागे जुने वैरही होते, याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे क्षुल्लक कारणांवरून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT