supriya sule news  Pudhari
नागपूर

Supriya Sule | कुरघोडी, घरफोडीचे उद्योग आम्ही कधीच केले नाहीत : खा. सुप्रिया सुळे

देशाच्या आर्थिक परिस्थितीवर राजकारण करण्याची नव्हे, तर देश वाचविण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

Supriya Sule Nagpur Visit

नागपूर - कोण कोणाच्या संपर्कात आहे, याबाबत मला माहिती नाही. पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि पवार साहेबांनीही कोणालाही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आपापसांत कुरघोडी करून घरफोडी आणि पक्षफोडीचे उद्योग आम्ही कधीही केले नाहीत आणि करणारही नाहीत.सध्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर राजकारण करण्याची नव्हे, तर देश वाचविण्याची वेळ आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम दिला.

दिवसभराच्या विदर्भ दौऱ्यावर आल्या असता त्या माध्यमांशी बोलत होत्या. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे भविष्य पाहायचे की आपापसांत वाद घालत बसायचे? अडचणीत आलेल्या जनतेला आधार देण्याची आमची जबाबदारी आहे.

घरफोडी आणि पक्षफोडीचे उद्योग आम्ही कधीही केले नाहीत आणि करणारही नाही असा दावा केला. विलीनीकरण बाबतीत मला कोणतीही माहिती नाही. ही बाब तुमच्याकडूनच कळली. मला आणि पवार साहेबांना याबाबत कोणतीही माहिती नाही अशी माध्यमांचीच फिरकी घेतली. देश आर्थिक संकटाच्या दिशेने जात असताना पंतप्रधानांनी सर्व पक्षांना बोलावून देशातील आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करावी, अशी आमच्या पक्षाची वारंवार मागणी राहिली आहे.

तृणमूल काँग्रेसची बैठक सोनिया गांधी आणि ममता दीदी यांच्यामध्ये झाली होती. त्या दोघींनी माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही आणि मीही त्यांच्याशी बोललेले नाही. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, हे त्यांनाच माहीत आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मी रोहितला सुरुवातीपासूनच उपोषण करू नको, अशी विनंती करत होते. मात्र हे सरकार इतके असंवेदनशील आहे की त्यांच्याविरोधात लढण्याची ताकद ठेवावी लागते. त्याचे शेतकऱ्यांवर मनापासून प्रेम आहे. शेतकऱ्यांसाठी रोहित संघर्ष उभा करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे.संजय राऊत हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन करण्याचा आणि सूचना देण्याचा अधिकार असतो असेही सांगितले.

आमदारांच्या भेटीगाठी नेहमीच्याच

देशातील सर्व मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते. त्यामुळे यामध्ये अस्वस्थ होण्यासारखे काही नाही. काल मी विनोद तावडे यांनादेखील भेटले. ते त्यांच्या कामासाठी आले होते आणि मी माझ्या कामासाठी गेले होते. कोणत्याही राजकीय पक्षातील नेते अनेकदा कामानिमित्त एकमेकांना भेटत असतात. आमच्या कोणत्याही आमदार, खासदार किंवा पदाधिकाऱ्यांशी कोणीही संपर्क साधलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT