नागपूर: नागपुरात एकीकडे आज (दि.१३) बुधवारी सकाळपासून पावसाने ओले चिंब केले तर दुसरीकडे मोरभवन सीताबर्डी येथून निघालेली एक शहर बस चालतानाच अचानक पेटल्याची घटना घडली. मात्र, चालक आणि वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने बसमधील सुमारे २० प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच ३१ एफसी ०९४१ क्रमांकाची ही शहर बस सीताबर्डीतून प्रवाशांना घेऊन निघाली होती. बस धावत असतानाच चालक आणि वाहकाला बसमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर चालक-वाहकाने बसमधील अग्निशमन उपकरणांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान गाडीसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. ऐन वर्दळीच्या वेळी आणि शहरात पावसाची रिपरिप सुरू असताना ही घटना घडल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली, याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.