नागपूर, पुढारी वृत्तसेवा : एका खाणीच्या जमिनीच्या वादातून एका तरुणाची सात आठ जणांनी त्याच्या कारची तोडफोड केल्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. दुसऱ्या एका घटनेत पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची सपासप शस्त्रांचे घाव घालीत हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. (Nagpur Crime News)
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सहा सात आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. आरोपीचे नाव अमोल पंचम बहादुरे (वय 42, रा. भोसले नगर, झोपडपट्टी भांडे प्लॉट) असे असून याप्रकरणी कुख्यात गुंड दिनेश गायकी यास अटक करण्यात आली. तर प्रवीण डेंगे, शुभम हटवार,प्रतीक गाढे व इतर आरोपी फरार आहेत. नागपूर जिल्ह्यातील चिमणाझरी येथील एका खाणीच्या जमिनीवरून मृत आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादात ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सक्क्रदरा पोलीस यासंदर्भात सखोल तपास करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत गोंड मोहल्ला वाठोडा परिसरात सात आठ जणांनी एका तरुणाची शस्त्राचे घाव घालून हत्या केली. अमोल वंजारी (वय 31) असे मृताचे नाव आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.