नागपूर, पुढारी वृत्तसेवा : समुपदेशनाच्या नावावर शेकडो अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांचे लैंगिक शोषण करणे, त्यांच्या चित्रफिती करून ब्लॅकमेल करणे, या आरोपाखाली कारागृहात असलेल्या समुपदेशक विजय घायवट याची पत्नी व तिची एक सहकारी अद्यापही पोलिसांना न सापडल्याने याप्रकरणी चौकशीवर संशय व्यक्त केला जात आहे. मृणाल विजय घायवट व पल्लवी किशोर बेलखोडे अशी या फरार आरोपींची नावे आहेत.
विजय घायवटला मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत हुडकेश्वर पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी न्यायालयाने प्रोडक्शन वॉरंट दिल्याने पोलिस विजयला कारागृहातून ताब्यात घेणार आहेत. मानेवाडा परिसरात विजय घायवटने 12-13 वर्ष आधी एक समुपदेशन केंद्र सुरू केले. त्या केंद्रात तो मानसोपचार, समुपदेशनाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलींचे, महिलांचे लैंगिक शोषण करीत होता. वर्षांवर सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आल्याने, या घटनेने उपराजधानीच नव्हे राज्यभर खळबळ उडाली. एका तरुणीने हिंमत दाखवून केलेल्या तक्रारीनुसार यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार विजय, पल्लवी व मृणालने या युवतीला केंद्रात बोलवले. दारू पाजली, पाणी प्यायला दिले. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. विजयने तिच्यावर बलात्कार केला. मोबाईलद्वारे आक्षेपार्ह चित्रीकरण केले. याच प्रकारे वारंवार ब्लॅकमेल करून घायवट हा तरुणींचे वारंवार शोषण करीत होता, अशा तक्रारी आता पुढे येत आहेत.