नागपूर - शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आमदार रवी राणा नेहमी अग्रेसर असतात. शुक्रवारी विधान भवन परिसरात त्यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना वाघाशी तर उद्धव ठाकरे यांची तुलना बिबट्याशी करत नवीन वादाला तोंड फोडले.
आमदार रवी राणा म्हणाले, राज्यातील जंगलांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे. बिबट हा प्राणी वाघांना घाबरतो. वाघांचा वावर असलेल्या जंगलात बिबट राहत नाही. त्यामुळे तो शहरी भागाकडे वारंवार दिसत आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. एकनाथ शिंदे हे खरे वाघ आहेत, तर उद्धव ठाकरे हे बिबट आहेत. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना भितात, असेही राणा म्हणाले.
बिबट हा मानवावर हल्ला करत नाही. तो श्वानांवर हल्ला करतो त्यामुळे शहरी भागातील श्वान तो घेऊन जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मी शासनाला बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यानुसार मी स्वतः दोन बिबटे पाळण्यास तयार आहे. पण त्यासाठी शासनाने परवानगी द्यायला हवी. योग्य व्यवस्था केल्यास त्याला पाळणे शक्य असल्याचेही रवी राणा म्हणाले.