नागपूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक, विचारवंत आणि जेष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम यांचे आज (दि.४ मार्च) निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 74 वर्षे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्यामागे मनपात अधिकारी असलेल्या पत्नी डॉ. सविता मेश्राम, जपानमध्ये असलेला मुलगा आणि मोठा परिवार आहे.
मध्यंतरी त्यांची तब्येत बिघडल्यावर काही दिवस ते केअर रुग्णालयात भरती होते. नंतर गेल्या काही महिन्यापासून कोमात होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत तसेच विविध राजकीय नेत्यांशी त्यांचा विशेष स्नेह होता. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे ते अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा) होते.
उत्कृष्ट क्राइम रिपोर्टर शृंखलेत त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. कुणावर झालेल्या अन्यायाविरोधात ते पोलिसांशी सतत लढा देत होते. विद्यापीठ बीटमध्येही त्यांचा विशेष दबदबा होता. अनेक पत्रकारांना त्यांनी घडविले. अनेक मान्यवरांनी त्यांना शोकसंवेदना व्यक्त केली.