ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन File Photo
नागपूर

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन

त्‍यांचे पार्थिव जुने गुरुकुल, शासकीय प्रेस कर्मचारी वसाहत दाभा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत ॲड. मा. म. गडकरी यांचे आज बुधवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वृद्धापकाळाने दाभा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. उद्या गुरुवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता अंबाझरी घाटावर त्‍यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ॲड. गडकरी यांचे पार्थिव आज दुपारी 4 वाजल्‍यापासून जुने गुरुकुल, 268, शासकीय प्रेस कर्मचारी वसाहत दाभा, नागपूर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9.30 वाजता इथूनच अंत्ययात्रा निघणार आहे. गडकरी यांच्या मागे पत्नी सुधाताई, पुत्र ॲड. वंदन गडकरी, तीन मुली आरती नाईक, अर्चना नितनवरे आणि महाराष्ट्र वित्त सेवेतील निवृत्त संचालक भारती झाडे व जावई ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे, महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता दिलीप नितनवरे, राजा रामन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे निवृत्त संचालक डॉ. प्रसाद नाईक आणि मोठा आप्तपरिवार आहे.

आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जयप्रकाश नारायण, कर्मयोगी बाबा आमटे, आचार्य दादा धर्माधिकारी, आर. के. पाटील, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, यदुनाथ थत्ते, ना. ग. गोरे, रवींद्र वर्मा, बाळासाहेब भारदे, प्राचार्य ठाकूरदासजी बंग, वल्लभ स्वामीजी, डॉ. एस. एन. सुब्बाराव आदिंशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या सहवासात ते अनेक वर्ष राहिले. ते आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. स्वतःसह कुटुंबातील अनेकांचे त्यांनी आंतर जातीय विवाह केलेत.

ॲड. मा. म. गडकरी यांचा जन्म 26 एप्रिल 1933 रोजी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या हिवरा या गावात झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. बी. एड. एल.एल.बी. झाले होते. ते 10 मार्च 2008 पासून तब्बल आठ वर्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञ मंडळाचे ते दीर्घकालीन अध्यक्ष होते. त्यांनी बापू शिक्षण संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना नई तालीमच्या दृष्टीने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

सर्व सेवा संघाचे ते मंत्री व विश्वस्त होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी मार्फत तत्व प्रचारक म्हणून त्यांनी तेरा वर्षे कार्य केले. स्वावलंबी विद्यालय वर्धा व श्रीकृष्ण हायस्कूल कान्होलीबारा येथे त्यांनी शिक्षक म्हणून आठ वर्षे कार्य केले. गांधीजींच्या कार्याने प्रेरित होऊन आठ वर्षे त्यांनी वर्धा शहरात सफाई काम केले. याशिवाय उच्च न्यायालयाचे ते सरकारी वकील होते. कायदे सल्लागार नागपूर जिल्हा परिषद नागपूरचे त्यांनी सात वर्षे कार्य केले. लॉ कॉलेज नागपूर येथे अल्पकालीन अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सहा वर्षे सेवा दिली. उमरेडच्या जीवन शिक्षण मंडळाचे ते संस्थापक होते. गुरुदेव सेवा मंडळ, काँग्रेस सेवा दल, राष्ट्रसेवादल, भूदान आंदोलनातही त्यांनी कार्य केले. त्यांनी विविध राष्ट्रीय प्रांतिक व स्थानिक शिबिरात सहभाग घेतला व आयोजन केले.

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि ज्येष्ठ विधीज्ञ मा. म. गडकरी यांच्या निधनाने सर्वोदयी चळवळीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले अशी शोकसंवेदना देशभरातील विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT