नागपूर : नागपूर शहरातील काही शाळांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने बुधवारी (दि.९) काही काळ खळबळ उडाली. या ई-मेलमध्ये खलिस्तानचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरू केला. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथके पाठवून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना वर्गखोल्यांमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी शाळेच्या परिसरासह विविध ठिकाणी बारकाईने तपासणी केली.
वर्धमाननगर येथील सेंटर पॉइंट स्कूलमध्येही बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. शाळेच्या आवारात तसेच परिसरातील संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सदृश्य पदार्थ आढळून आला नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठविला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ई-मेलचा स्रोत, पाठविणाऱ्याची ओळख तसेच त्यामागील हेतू याबाबत सायबर तपासही केला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.