SBL Energy Limited FIR
नागपूर : भीषण स्फोटात आतापर्यंत 18 कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेडमधील स्फोट प्रकरणात कंपनीच्या मालकावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) Section 105 – अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कालपासून मागणी केली जात होती.
कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या स्फोटात १८ कामगारांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. एसबीएल एनर्जी लिमिटेडचे मालक संजय चौधरी यांच्यासह इतर संचालक, प्लांट हेड आणि मॅनेजरवरही गुन्हा दाखल झाला आहे.
एसबीएल एनर्जी लिमिटेडच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, आज या स्फोटासंदर्भातील पुढील कारवाईबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक होणार आहे.
एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील गंभीर जखमी आणखी एका महिलेचा आज मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 19 झाली आहे. एसबीएल स्फोटातील रंजना उत्तम घागरे (वय 35) या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. 18 गंभीर जखमींपैकी 8 ते 10 जण आयसीयुत असून या घटनेने नागपूर जिल्ह्यातील विविध स्फोटक निर्मिती कंपनीच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी सहा वाजता या महिला कामावर गेल्या. साडेसातच्या सुमारास डीटो नेटरच्या स्फोटात, भीषण आगीत या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.