Bank Robbery AI Photo
नागपूर

Nagpur Bank Robbery | शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी एसबीआय बँकेवर दरोडा; रोख भरणा यंत्रावर लक्ष ठेवून रचला कट

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक; सक्करदरा पोलिसांचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

Nagpur SBI Sakkardara Branch Robbery

नागपूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी एका शिक्षित बेरोजगार युवकाने चक्क बँक लुटण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून त्याने तब्बल ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड लुटून पलायन केले. मात्र, घटनेची माहिती मिळताच सक्रिय झालेल्या सक्करदरा पोलिसांनी काही वेळातच आरोपीला पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून लुटीची संपूर्ण रोकडही जप्त करण्यात आली.

ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सूरज बोरकर (२८), रा. तातोली, भिवापूर असे आहे. सूरजने बीएससीपर्यंत शिक्षण घेतले असून तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कर्जाचा बोजा वाढल्याने बँक लुटण्याचा कट

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सूरजने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा तोटा झाल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला. कर्ज फेडण्यासाठी त्याने बँक लुटण्याची योजना आखल्याचे तपासात समोर आले आहे.

रोख भरणा यंत्रावर ठेवले लक्ष

गुरुवारी सायंकाळी सूरज भांडे प्लॉट चौकातील एसबीआय शाखेबाहेर असलेल्या रोख भरणा यंत्रावर लक्ष ठेवून होता. बँकेचे कर्मचारी यंत्रातून रोकड काढून ती बँकेत जमा करण्यासाठी जात असताना सूरजने त्यांच्या मागून अचानक मिरची पूड फेकली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना झटका देत सूरजने ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड घेऊन तेथून पळ काढला. संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

एनआयटी उद्यानाजवळ पोलिसांनी पकडले

घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परिसरात आधीपासूनच गस्त सुरू होती. याचदरम्यान पोलीस कर्मचारी टप्पूलाल चुटे, राजेंद्र मोहोड, शैलेश बेलेकर आणि शरदसिंग टेंभरे यांना एनआयटी उद्यानाजवळ एक संशयित युवक पळताना दिसला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर सूरजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लुटीची संपूर्ण ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करीत असून, बँक लुटीच्या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT