NCP students protest
नागपूर : नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) कार्यालयातील भोंगळ कारभाराविरोधात शुक्रवारी (दि.५) तीव्र निषेध नोंदवून निवेदन सादर करण्यात आले.
शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या उपस्थितीत व विद्यार्थी अध्यक्ष विश्वजीत (मुन्ना) तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. नागरिकांना वाहन परवाना, नोंदणी, तपासणी, शुल्क भरणा इत्यादी नियमित कामांमध्ये वाढत चाललेल्या मनमानी, भ्रष्टाचार, दलालशाही व सामान्य नागरिकांवरील अन्यायपूर्ण वागणूक याबाबत गंभीर तक्रारी नोंदवण्यात आल्या.
आरटीओ मध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे नागरिक व विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणींचा निषेध करून, या भ्रष्ट कारभारावर तात्काळ नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. विभागातील गैरकारभारासाठी जबाबदार मानले जाणारे मनोज अवतारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. दलालांच्या माध्यमातूनच कामे, थेट आलेल्या नागरिकांना टाळाटाळ, अन्यायामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला.
15 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास शहरात मोठे जनआंदोलन उभे करू असा इशारा देण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष राकेश घोसेकर, शहर उपाध्यक्ष संतोष भुजाडे, मनोज जरेल, सुझल मून, हिमांशु लांडगे, यश चंदनबवने, आयुष तिवारी, अभिनव कात्रे, प्रकाश राठोड़, अधुतोष ठाकुर, राम चार्डे, देवेंद्र लिल्हारे, रोहित राउत, वैभव बावने, रोशन जेठवंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.