नागपूर : महाल गांधीगेट परिसरातील दोन गटात तणाव हा बाहेरून लोक आणून दंगल घडवण्याचा प्रयत्न होता असा आरोप भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. यात सहभागी असणाऱ्यांना शोधून पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचेही सांगितले. दोन गट आमने सामने आल्याने मनपा, अग्निशमन विभागाचे 10 -15 जवान जखमी झाले. अतिशय अरुंद अशा गल्लीबोळांचा हा महाल, भालदारपुरा, चिटणीस पार्कचा वर्दळीचा परिसर असून पोलिसांनी सीसीटीव्ही, कंट्रोल रुमच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. आज दिवसभर या भागात आंदोलन, प्रति आंदोलन सुरू होते. रात्री उशिरापर्यंत स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात झालेल्या संघर्षाची घटना दुर्दैवी आहे. एकता आणि सलोखा म्हणजे नागपूरचा महाल परिसर! या परिसरात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने व एकोप्याने गेले अनेक वर्षापासून राहत आले आहेत. ही परंपरा कायम राहिली पाहिजे अशी अपेक्षा शिवसेना नेते आमदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न करता सामंजस्याची भूमिका घेऊन शांतता कायम ठेवावी. पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे. लोकप्रतिनिधी, सरकार व प्रशासनातील सर्वच जनतेच्या सहकार्यासाठी तत्पर आहेत. शांत शहराला सत्ताधाऱ्यांनी गालबोट लावले, चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर करावे असे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार म्हणाले असून माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पण असाच आरोप केला आहे.