Illegal Money Lending Nagpur
नागपूर : सावकारीच्या नावाखाली गरजू व्यक्तीला कर्जाच्या जाळ्यात ओढून अवाजवी रक्कम वसूल केल्यानंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दोन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल ६ लाख १० हजार रुपये वसूल केल्याचा दावा निवृत्त शिक्षकाने केला असून, त्यानंतर दोन प्लॉटच्या कागदपत्रांवरही दबाव आणि धमकीच्या वातावरणात स्वाक्षऱ्या करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी कमलेश हनोते आणि अनिता भारद्वाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, निवृत्त शिक्षक दिलीप श्रीराम कुंभारे यांनी एप्रिल २०२४ मध्ये दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज देताना दोन कोरे धनादेश आणि स्वाक्षरी केलेला मुद्रांक कागद घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर विविध व्यक्तींच्या बँक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने रक्कम पाठविण्यास सांगण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
२५ मे २०२४ रोजी कमलेश हनोते आणि त्याचा एक साथीदार कुंभारे यांच्या घरी आले. व्याजाची रक्कम न दिल्याचे सांगत पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास मारहाण करण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच घर खाली करण्यासाठीही दबाव आणल्याचे कुंभारे यांनी पोलिसांना सांगितले.
तक्रारदाराच्या आरोपानुसार, वांझरा परिसरातील सुमारे १,२५० चौरस फुटांच्या प्लॉटशी संबंधित कागदपत्रे करून घेण्यात आली. त्यानंतर बेसा परिसरातील सुमारे २,३०० चौरस फुटांच्या मालमत्तेबाबतही करारनामा करून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
१० जानेवारी २०२५ रोजी कुंभारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाहनातून भगवाननगर-अजनी परिसरात नेण्यात आले. तेथे नोटरीसमोर मालमत्तेच्या करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कमलेश हनोते याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत यापूर्वी पाच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. अनिता भारद्वाज हिचाही तीन प्रकरणांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पूर्वीच्या प्रकरणांतील अनिता आणि सध्याच्या गुन्ह्यातील अनिता पुरणलाल भारद्वाज हीच व्यक्ती आहे की नाही, याची अधिकृत पडताळणी तपासातून होणार आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून फोन-पे व्यवहार, संबंधित बँक खाती, धनादेश, मुद्रांक कागद तसेच वांझरा आणि बेसा येथील प्लॉटशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. कर्जाची प्रत्यक्ष रक्कम, कथितपणे वसूल करण्यात आलेली रक्कम आणि मालमत्तेच्या व्यवहारांमागील परिस्थिती याबाबतही पोलिस तपास करीत आहेत.