नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौक येथील शासकीय मुलांच्या बाल सुधारगृहातून चार अल्पवयीन बालकांनी पलायन केल्याची घटना समोर आली. गंभीर गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या या चारही मुलांनी रविवारी (दि.३०) मध्यरात्री पलायन केले. सोमवारी ही बाब उघडकीस आली. पोलीस यंत्रणेत आणि सुधारगृहाच्या सुरक्षेवर मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला आहे.
यशवंत, नूर, अंकुश आणि राहिल अशी या पसार झालेल्या मुलांची नावे आहेत. (ही सर्व नावे बदललेली असून चौघांचे वय १६ ते १७ वर्षे आहे.) यातील एक मुलगा परिसरात दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत हा हुडकेश्वर येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी असून, त्याला २८ जुलै रोजी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले. नूर हा कामठी येथील हत्याकांडातील आरोपी असून, त्याला ६ मार्च रोजी येथे दाखल करण्यात आले.
अंकुशला १६ ऑगस्ट रोजी शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये ताब्यात घेण्यात आले. तर राहिलला ७ ऑगस्ट रोजी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले. रविवारी मध्यरात्री संधी साधून चौघेही एकाच वेळी बालसुधारगृहातून पसार झाले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काळजीवाहकाने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.