नागपूर: भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात आजपासून (दि.२५ सप्टें) ते शनिवारपर्यंत (दि.२७ सप्टे.) येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळी वारा तसेच वीजगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे पाटबंधारे प्रकल्प जसे तोतलाडोह व नवेगाव खैरी हे १०० टक्के क्षमतेने भरलेले असून वडगाव व नांद धरण हे जवळपास १०० टक्के क्षमतेने भरलेले आहेत. मध्यम स्वरूपाची धरणेसुद्धा जवळपास १०० टक्के भरलेली आहेत. नदी व नाले हे पुर्ण क्षमतेने वाहत आहेत. या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वीजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोनसोबत बाळगू नये. वीजगर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊसामध्ये चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तसेच नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते. अशावेळी पुल, रस्ता चालत किंवा गाडीने ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.