नागपूर - गणेशोत्सवानंतर गेट-टुगेदर करण्यासाठी एकत्र आलेल्या सन २०१३ च्या जीआरपी बॅचमधील नऊ पोलिस मित्रांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना डोक्याला जोराचा मार लागल्याने रेल्वे पोलीस दलातील सचिन घनश्याम आवारी (वय ३८, रा. गायत्री नगर, सचिन लेआऊट, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील मौजा सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्म येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.
सन २०१३ मध्ये जीआरपी रेल्वे पोलीस दलात एकत्र भरती झालेले राहुल हरीचंद्र राजगिरे, विपीन पिलेवान, नितुल सावजी, शिवशंकर बिसेन, निलेश निकोडे, यशवंत गायकवाड, देवेंद्र राकेश, प्रतिक ईटनकर आणि सचिन घनश्याम आवारी हे नऊ बॅचमेट दरवर्षी गेट-टुगेदर करीत होते. यावर्षीही गणेशोत्सवामुळे विसर्जनानंतर गेट-टुगेदर करण्याचे ठरले होते.
त्यानुसार सर्व नऊ मित्र तीन चारचाकी वाहनांतून रात्री सुमारे ९ वाजता नागपूरहून निघाले. रात्री अंदाजे १०.१५ वाजता ते सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्मवर पोहोचले. तेथे सर्वांनी मिळून जेवण तयार केले. जेवणानंतर मित्र स्विमिंग पूलमध्ये पोहत व एकत्र मौजमजा करीत वेळ घालवत होते.दरम्यान, रात्री १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास सचिन आवारी यांनी स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. यावेळी त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. कुही पोलिस पुढील तपास करीत आहेत.