नागपूर : निवडणूक आटोपताच नागपुरात दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना देखील हेल्मेटची सक्ती सुरू झाली असल्याने जनमानसात संताप आहे. राजकीय पक्ष देखील यावर संतप्त असून शहरात कशाला हवी ही सक्ती ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अपर पोलीस महासंचालक वाहतूक कार्यालयाने या संदर्भात आदेश जारी केल्यानंतर या आदेशाची प्रत समाज माध्यमांवर व्हायरल झाली. वाहतूक शाखेला आदेश प्राप्त होताच नागपुरातील वाहतूक शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी दिले. त्यामुळे आता कुणाला लिफ्ट देणे किंवा एखाद्या मित्राला सोडून देणे महागात पडणार आहे. दुचाकीवर डबल सीट जाणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
मोटर वाहन कार्यालयात याविषयीची आधीपासून तरतूद आहे. चांडक यांनी दिलेल्या आदेशानुसार मोटार वाहन कायद्याच्या 1988 कलम 128, 129 मध्ये दुचाकी चालवीणारा आणि मागे बसणाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोघांनी हेल्मेट घालने आवश्यक आहे. दोघे हेल्मेट घालत नसल्याने अपघातातील मृत्यू, जखमीची संख्या वाढत आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्यावर यात भर देण्यात आला आहे.
शहरातील विविध ठिकाणच्या 4518 सीसीटीव्हिद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. चौकाचौकात तैनात पोलीस अधिकारी, अंमलदार यांनीही मागे बसणाऱ्याने हेल्मेट घालून वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन चांडक यांनी केले आहे. गेल्या वर्षभराचा विचार करता 191 अपघातात 113 जणांचा मृत्यू झाला.विशेष म्हणजे हे सर्वजण बिना हेल्मेट होते. अपघाताच्या सर्वाधिक घटना वाहतूक शाखेच्या अजनी विभागात घडल्या याबाबत 48 घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण एमआयडीसी विभागात आहे सर्वाधिक 34 अपघातामध्ये 34 जणांचा जीव गेला.