नागपूर: भाजपची आम्ही काँग्रेस होऊ देणार नाही, बाहेरून आलेल्यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिल्यास आमच्या प्रभागात भाजपचे बूथ सुद्धा लावणार नाहीत असा इशारा धरमपेठ प्रभाग 15 मधील भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी आज सोमवारी दुपारी नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धडक दिली.
मनपा निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला वेग आलेला असताना भाजपची ही नाराजी पुढे आली आहे. प्रभाग 15 मधील भाजपचे अनेक स्त्री, पुरुष निष्ठावंत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री दिनेश गावंडे यांनी ही नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा प्रभाग 15 धरमपेठ येतो. मुख्य म्हणजे त्यांचे निवासस्थान याच परिसरात असून ते स्वतः या प्रभागाचे मतदार आहेत. अशावेळी स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली ही तीव्र नाराजी नक्कीच पक्षांतर्गत मोठी धुसफूस सुरू असल्याचे दाखवीत आहे.
अनेक प्रभागांमधून आता ही नाराजी हळूहळू पुढे येण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या नागपूर महापालिकेसाठी भाजप, शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत आहे. या पार्श्वभूमीवर बाहेरून केवळ तिकिटासाठी पक्षात येणाऱ्यांना भाजपचे तिकीट दिले गेल्यास आम्ही पक्षासाठी काम करणार नाही ही भूमिका भाजपचे निष्ठावंत आता घेताना दिसत आहेत.