Nagpur Police Sub-Inspector bribe case
नागपूर: आरोपीविरुद्ध न्यायालयात सादर करण्यात येणारे दोषारोपपत्र चार्जशीट कमजोर करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख मागणाऱ्या आणि नंतर एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली असलेल्या पोलीस भवनातच लाच मागण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने एसीबीने ही कारवाई केली.
उपनिरीक्षक गणेश गोविंद राऊत (वय 51, रा. पोलीस क्वार्टर, मूळ रा. शांती कॉलनी, अकोली रोड, अमरावती) व हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर दामोदर घागरे (वय 50, रा. श्रीनगर, गोधनी रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मे महिन्यात एका 36 वर्षीय युवकाविरुद्ध भूखंड प्रकरणात वाठोडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. उपनिरीक्षक राऊत आणि घागरे या दोघाकडे या प्रकरणाचा तपास असल्याने युवकाला अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडी अंतर्गत तो कारागृहातही गेला. मात्र, पुढे त्रास नको म्हणून न्यायालयात कमकुवत दोषारोप पत्र सादर करण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, अपर अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपधीक्षक राकेश साखरकर, निरीक्षक मयूर चौरसिया, विवेक पडधान व त्यांचे सहकारी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. राऊत व घागरे यांनी युवकाला एक लाखाची लाच मागितली. चार ऑगस्टला एसीबीच्या पथकाने पंच समक्ष पोलीस भवन सापळा रचला. मात्र एसीबीच्या पथकाचा सुगावा लागल्याने दोघांनी लाच घेतली नाही. एसीबीने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर गुरुवारी या दोघांविरोधात सदर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.