Plastic Warehouse Fire Nagpur
नागपूर : गोल्ड कॉईन हॉटेलच्या बाजूला प्लास्टिकचे गोदामाजवळ मंगळवारी (दि.१०) दुपारी भीषण आग लागली. हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी कचरा जाळला त्यानंतर जवळ असलेल्या प्लॉस्टिकच्या गोदामाला आग लागली, अशी प्राथमिक माहिती आहे. खरसोली रोड जबलपूर महामार्गावर ही घटना घडली.
दरम्यान, एक फायटर प्लेन खाली एका घरावर पडल्याने ही आग लागल्याचा दावा एका अती उत्साही तरुणाने केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गेल्या काही दिवसातील विमान अपघातांच्या भीषण घटना पाहता नागपुरात खळबळ माजली.
मात्र, चौकशीत ही बाब खोटी असल्याचे पुढे आले. आग लागल्यानंतर धुराचे लोळ आकाशात दूरवर दिसत असल्याने महामार्गावर अनेक वाहने थांबली. लोकांची मोठी गर्दी झाली. तातडीने 5-6 अग्निशमन दलाचे बंब नागपुरातून घटनास्थळी पोहोचल्या. अखेरीस भंगार गोडाऊनला आग लागली आहे हे उघड झाले.