नागपूर : १० दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी आनंदाने निघालेल्या कामठी येथील कुटुंबावर राजस्थानच्या डीडवाना भागात काळाने भीषण झडप घातली. तवेरा कार आणि पिकअप यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील ३ सदस्यांचा मृत्यू झाला असून, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महादेव पारसे (वय ६० वर्ष) , पत्नी कांता महादेव पारसे (वय ५० वर्ष) आणि मुलगा घनश्याम महादेव पारसे (वय २३ वर्ष) यांचा समावेश आहे.या घटनेमुळे कामठी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी येथील हे कुटुंब गेल्या शनिवारी आपल्या १० दिवसांच्या उत्तर भारत तीर्थयात्रेसाठी तवेरा कारने निघाले होते. उज्जैनंतर काल त्यांनी राजस्थानमधील खाटू श्याम बाबाचे दर्शन घेतले. त्यानंतर हे कुटुंब पुढे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले होते.आज पहाटे डीडवाना येथील सालासर चौकाजवळ त्यांच्या तावेरा कारला समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.
प्राथमिक माहितीनुसार एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, मात्र ताज्या वृत्तानुसार या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश असून, सर्वांना तातडीने डीडवाना येथील शासकीय बांगड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेत पवन आणि घनश्याम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पण यापैकी घनश्याम पारसे यांचा मृत्यू झाला. पारवे कुटुंब हे कामठीतील प्रतिष्ठित आणि सुस्वभावी कुटुंब म्हणून ओळखले जाते. घटनेची माहिती मिळताच कामठीतील नातेवाईक आणि मित्रमंडळींनी राजस्थानकडे धाव घेतली आहे.
प्रवासाचा आनंद विरला दुःखात
मिळालेल्या माहितीनुसार, कामठीच्या वारिसपुरा येथील पारसे कुटुंब शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास तवेरा कारने तीर्थयात्रेसाठी निघाले होते. प्रथम उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेऊन हे कुटुंब राजस्थानमधील खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी पोहोचले.
एकाच कुटुंबातील १० जणांचा समावेश
या भीषण अपघातात कारमधील १० ही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
तुषार पारसे (वय २५ वर्ष)
पवन बागडे (वय २१ वर्ष)
कु. पूनम पारसे (वय २० वर्ष)
आराधना पारसे (वय २३ वर्ष)
पायल पारसे (वय २१ वर्ष)
पल्लवी पारसे (वय २० वर्ष)
मनोज चिंदमवार (चालक, वय ३५ वर्ष)