नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज वर्दळीच्या इतवारी बाजारपेठ परिसरात लोहाओळींमध्ये एका रंगाच्या (पेंट) दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अतिशय गजबजलेला परिसर असल्याने अग्निशमन विभागाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, इतवारी परिसरात लोहा ओळीमध्ये फकदुद्दीन हसरअली आणि ब्रदर्स नावाचे हे पेंटचे दुकान आहे. सकाळी पाचच्या सुमारास दुकान बंद असताना दुकानांचे आतमधून धूर दिसू लागला. याबाबत फिरायला जाणाऱ्या एका व्यक्तीने अग्निशामन विभागाला माहिती दिली. दुकानांमध्ये पेंट आणि केमिकल पदार्थ असल्यामुळे ही आग झपाट्याने पसरली. दरम्यान, घटनास्थळी जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे अग्निशमन विभागाला सुरुवातीला आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन विभागला यश आले. नेमकी ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.