Nagpur on alert mode, holidays cancelled, permission required for drones!
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. कोणत्याही कार्यक्रमासाठी ड्रोनची परवानगी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहावे. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या दृष्टीने मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनातर्फे ज्या काही सूचना केल्या जातील त्याचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून काटेकोरपालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज शनिवारी केले.
नियोजन भवन येथे खबरदारीच्या उपाययोजनेसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे संचालक डॉ. हरी ओम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व बी. वैष्णवी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उप वनसंरक्षक भारतसिह हाडा, राष्ट्रीय अग्नी सेवा महासंचालनालयाचे माजी संचालक राजेश चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व आस्थापनांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
या तणावाच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणांनी आपल्या जवळ असलेल्या सर्व सुविधा प्रत्यक्ष खातरजमा करुन तत्पर ठेवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. विशेषत: आपात कालीन परिस्थितीत आव्हाने निर्माण झालीत तर यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे हॉस्पिटलमधील बेड/कॉटची व्यवस्था, स्टेचरची सुस्थिती, सुरक्षा यंत्रणा याबाबी तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले. काही ठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्याचे निर्देश डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
नागरिकांच्या आवश्यक असलेल्या सेवा सुविधा सुस्थितीत राहव्या यादृष्टीने महानगर पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, पंचायत समिती यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. पाणी पुरवठ्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, आपल्या अखत्यारित असलेली सार्वजनिक रुग्णालय तत्पर ठेवणे, जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणे, कुठेही अराजकता होऊ नये यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपसी सहकार्याच्या भावनेतून अधिक जबाबदार प्रशासनाचा प्रत्यय दिला पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला डिझेल व पेट्रोलची कमतरता भासणार नाही असे नियोजन शासनाने करुन ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. नेहमीप्रमाणे आपल्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार लागेल तेवढेच पेट्रोल/डिझेल घेण्याच्या सूचना या बैठकीद्वारे करण्यात आल्या.