नागपूर: गोळवलकर गुरुजींचा संदर्भ देऊन संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट  pudhari photo
नागपूर

नागपूर: गोळवलकर गुरुजींचा संदर्भ देऊन संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

Social media post: संवेदनातर्फे आंदोलन,पोलिसात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेल्या एका विधानावरून राजधानी मुंबईत राजकीय वातावरण तापले. विरोधक,सत्ताधारी सामना रंगला. दुसरीकडे उपराजधानीत गोळवलकर गुरुजींच्या विधानाविषयी आंदोलन झाले. भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत विधान केल्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला.विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या ग्रंथामधील चुकीचा संदर्भ देऊन समाज माध्यमावर चुकीची पोस्ट करण्यात आल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

गोळवलकर गुरुजींचा संदर्भ देऊन छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट दोन फेसबुक खात्यांवरून टाकण्यात आली. याविरोधात नागपुरात ‘संवेदना’ परिवार संस्थेच्या वतीने महाल परिसरात आंदोलन करण्यात आले. यानंतर कोतवाली पोलिसात तक्रारही देण्यात आली. फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर शेमलेस इरा आणि दि न्यू इंडिया या नावाने दोन अकाउंटवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या लिखाणाचा संदर्भ देत छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पोस्ट्स टाकण्यात आल्या. ‘शेमलेस इरा’ या नावाचे अकाउंट असलेल्या व्यक्तीने ‘एनएच-३४, इंग्लिश बाजार, इंडिया ७३२१२७’ असा पत्ता दिला असून, स्वतःला पब्लिक अँड गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हटलेले आहे.

दरम्यान, दि न्यू इंडिया चालविणाऱ्या व्यक्तीने thenewindia१५८२@gmail.com असा मेल एड्रेस दिलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत गोळवलकर गुरुजी यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात काही बदनामीकारक विधाने असल्याचा दावा या पोस्ट्सच्या माध्यमातून केला आहे.मुळात हा दावा निराधार आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची व शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याने अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संवेदना परिवाराने या तक्रारीत केली आहे. प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देताना काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून राज्यभर वातावरण तापले. विधिमंडळातही याचे पडसाद उमटले.

आता गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. विरोधकांच्या आरोपाना उत्तर देताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयीन प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT