नागपूर - उद्या शनिवारी 9 ऑगस्टला नागपूरात ओबीसींच्या जागरासाठी मंडल यात्रा काढली जाणार असून स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष खा शरद पवार हिरवी झेंडी दाखविणार आहेत. गुरुवारी रात्री त्यांचे आगमन झाले. विमानतळावर उत्साहात स्वागत झाले. नागपुरात माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्याकडे स्नेहभोजन निमित्ताने त्यांचा विदर्भातील नेते, पदाधिकारी संवाद झाला.
भाजपाचे ओबीसी विरोधी धोरण आणि शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य जनतेपर्यत पोहविण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील 11 जिल्हात ही यात्रा जाणार असून तालुक्याच्या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असतांना शरद पवार यांनी मंडल आयोग राज्यात लागु केला होता. महाराष्ट हे देशातील पहिले राज्य ठरले. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आज ओबीसीवरचे भाजपाचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे. शरद पवार यांनी ओबीसीसाठी काय केले ? याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या माध्यमातुन प्रदेश अध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वात ही राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. क्रांती दिनी याची सुरवात नागपूर येथून होत आहे
यानिमित्ताने ओबीसीच्या हक्क,आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी श्रेयाच्या राजकीय लढाईचा इतिहास पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर येणार असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड, रोहित पवार,सलील देशमुख आदी अनेकजण सहभागी होणार आहेत.
या दौऱ्यात शरद पवार विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. कवी, लेखक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार असून आपली भूमिकाही मांडणार आहेत. एकंदरीत विरोधकांना ओबीसींच्या मुद्द्यावर सातत्याने घेरणाऱ्या भाजपला आता सडेतोड उत्तर देण्याची तयारी विरोधक करीत आहेत. यादृष्टीने शरद पवार यांचा हा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे.