नागपूर: महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत (ड्रॉ) जाहीर झाल्यानंतर नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठे उलटफेर झाले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली असून, कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर कुणाच्या भुवया उंचावल्या आहेत.
आरक्षणामुळे ज्या प्रमुख नेत्यांना धक्का बसला आहे, त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या गुडघे यांना प्रभाग ३८ मध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे.
प्रभाग ३८: प्रफुल्ल गुडघे यांच्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी तर एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुडघे म्हणाले, "मी लढणार नाही, पण आमचे कार्यकर्ते तयार आहेत. तिन्ही जागा काँग्रेसचे उमेदवार जिंकतील."
प्रभाग २३: भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती बाल्या बोरकर यांनाही आरक्षणामुळे प्रभाग शोधावा लागणार आहे. त्यांच्या प्रभागात ओबीसी महिला आरक्षण आले आहे. याच प्रभागात २०१९ मध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे निवडून आले होते, त्यामुळे इथे बोरकर विरुद्ध पेठे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
नागेश सहारे, मीनाक्षी तेलगोटे, प्रमोद तभाने, संजय बालपांडे (भाजप), बसपचे जितेंद्र घोडेस्वार आणि संजय बुरेवार यांसारख्या अनेक माजी नगरसेवकांनाही आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे. केतन ठाकरे यांनाही तयारी करावी लागणार: काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे प्रभाग ९ आणि १३ मधून तयारी करत होते. आता त्यांनाही नवा आणि सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे.
याउलट, काही प्रमुख उमेदवारांचे प्रभाग सुरक्षित राहिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षित प्रभाग असलेले नेते: विकी कुकरेजा, मनोज सांगोळे, संदीप सहारे, प्रवीण भिशीकर, संदीप जाधव, परिणीता फुके, संजय बंगाले, दयाशंकर तिवारी, आभा पांडे, चेतना टाक, पुरुषोत्तम हजारे, तानाजी वनवे, धर्मपाल मेश्राम, किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर आणि अविनाश ठाकरे.
शहरात एकूण ३८ प्रभाग आहेत. यापैकी ३७ प्रभागात प्रत्येकी चार सदस्य तर शेवटच्या ३८ क्रमांकाच्या प्रभागात केवळ तीन सदस्य असतील. तब्बल आठ वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत असल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.