नागपूर: अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
बावनकुळे म्हणाले की, महायुती होणार असून भाजपचे सर्वेक्षणावर आधारित उमेदवार रविवारी (दि.२८ डिसेंबर) अंतिम करण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्षांची मान्यता मिळाल्यानंतर यादीला अंतिम स्वरूप दिले जाईल. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून महायुती मोठे यश संपादन करेल.
महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र चर्चा सुरू असून, ३० तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडतील. महायुती तसेच भाजप उमेदवारांबाबत चर्चा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर महानगरपालिकेची यादी रविवारीच (दि.२८) अंतिम झाली आहे. संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, ते दिवसभर नकारात्मक विचार ऐकतात आणि नकारात्मकच बोलतात. तेच त्यांचे रोजचे काम आहे. अमरावतीत ‘युवा स्वाभिमान’बाबत चर्चा पूर्ण झाली असून शिवसेनेसोबतची चर्चाही पूर्ण झाली आहे. अमरावतीत शिवसेनेकडून जागांची मागणी करण्यात आली असून चर्चा सुरू आहे.
सध्याच्या ‘सीटिंग’च्या प्रमाणातच जागांची मागणी करावी, असे मत व्यक्त करत लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आज महाराष्ट्र व देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे संघटन बनले आहे. भाजपची विचारधारा राष्ट्रनिर्माण आणि विकासाची आहे यावर भर दिला.
चंद्रपूरमधील नेते एकत्र
चंद्रपूरमधील सर्व प्रमुख नेते एकत्र असून कोणतेही मतभेद नाहीत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे वरिष्ठ नेते आहेत. किशोर जोरगेवार हे निवडणूक निरीक्षक व प्रमुख असल्याने चंद्रपूरमध्ये भाजप निवडणूक प्रभावीपणे जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.विदर्भातील काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत युतीबाबत चर्चा सुरू असून, अकोला व चंद्रपूरमध्ये अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जिथे युती नाही, तिथे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.