राजेंद्र उट्टलवार
नागपूर: विधानसभा निवडणुकीपाठोपाठ मनपा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी भाजपा शिवसेना महायुतीला साथ देणार असल्याचे दिसत आहे. राज्यातील 29 पैकी 27 महापालिकामध्ये महायुतीचा महापौर होईल हे भाकीत यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी बहुतांशी ठिकाणी स्वतंत्रपणे लढत आहे. काही जागी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा एकत्र आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असली तरी देखील मत विभाजनात त्यांचा फटका अर्थातच काँग्रेसला बसणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा निवडणुकीसमोर काँग्रेसने लाडकी बहीण योजनेचा केलेला विरोध भाजपने आता निर्णायक टप्प्यात कळीचा मुद्दा केला आहे.
ठिकठिकाणच्या सभांमधून भाजपने अडीच कोटी लाडक्या बहिणी काँग्रेसला धडा शिकवतील असे भावनिक आवाहन सुरू केले आहे.महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. आमच्या माता- भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली. आता नियमित पैसे मिळत असताना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तर,पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष, मत्सर, आकस उफाळून आला.
काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली असा आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करणारच असल्याची ग्वाही दिली आहे. दुसरीकडे ही रक्कम लाडक्या बहिणींना देऊ नका, म्हणून काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र दिले.
आम्ही काँग्रेसच्या या विकृत कृतीचा निषेध करीत आहोत. काँग्रेसला या राज्यातील आमच्या माता- भगिनी कधीही माफ करणार नाहीत असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर मनपा जाहीरनामा प्रकाशन निमित्ताने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. एकंदरीत काँग्रेसची लाडक्या बहिणीचा मुद्दा अडचण करण्याची चिन्हे आहेत.