Child Death Pudhari
नागपूर

Nagpur News : दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, भावंडांना ‘टाटा’ करताना अचानक तोल गेला अन्..

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : येथील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोधीपुरा परिसरात दुसऱ्या मजल्यावरून पडून एका तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. लक्की रिंकू साहू असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. भावंडांना शाळेत जाताना निरोप (टाटा) देण्यासाठी तो ग्रिलजवळ गेला असता खाली वाकून पाहताना त्याचा तोल गेला आणि ही दुर्घटना घडली.

लोधीपुरा परिसरातील साई मंदिराजवळ साहू कुटुंबीय सुमारे महिन्याभरापूर्वीच भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले लक्कीचे वडील पाणीपुरीचा व्यवसाय करतात. कुटुंबात तीन मुले आणि एक मुलगी असून लक्की हा सर्वांत लहान होता.

२० ऑगस्ट रोजी सकाळी लक्कीचे दोन भाऊ आणि बहीण शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांना निरोप देण्यासाठी लक्की दुसऱ्या मजल्यावरील ग्रिलजवळ गेला. भावंडांकडे पाहण्यासाठी तो खाली वाकला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट जमिनीवर कोसळला.

लक्की खाली पडल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे साहू कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT