नागपूर : थर्ड आउटर रिंग रोड प्रकल्पासाठी पारशिवणी तालुक्यातील बोरी (राणी) येथे सुरू करण्यात येणाऱ्या मोजणी प्रक्रियेला बाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी जोरदार विरोध केला. शेतकरी संघर्ष सेनेच्या नेतृत्वाखाली नऊ तालुक्यांतील शेतकरी प्रतिनिधी आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोजणीला विरोध दर्शविला. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाने मोजणी प्रक्रिया थांबवून उद्या जिल्हाधिकारी, NMRDA अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
मोजणी प्रक्रियेसाठी रामटेकचे उपविभागीय अधिकारी, पारशिवणीचे तहसीलदार, पटवारी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकही उपस्थित होते. मात्र, थर्ड आउटर रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी संघटित होत मोजणी प्रक्रियेला विरोध केला.
शेतकऱ्यांचा विरोध तीव्र होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बाधित शेतकरी, शेतकरी संघर्ष सेनेचे शिष्टमंडळ आणि NMRDA अधिकाऱ्यांची उद्या संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोबदल्याचा मुद्दा केंद्रस्थानी
या बैठकीत थर्ड आउटर रिंग रोड प्रकल्पाची सविस्तर माहिती, शेतकऱ्यांच्या मागण्या, मोजणीची प्रक्रिया आणि जमीन संपादनाच्या बदल्यात देण्यात येणारा योग्य व न्याय्य मोबदला यावर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष सेनेने केली आहे.
योग्य मोबदला निश्चित झाल्याशिवाय मोजणी करू नये, अशी ठाम भूमिका शेतकरी संघर्ष सेनेने घेतली आहे. थर्ड आउटर रिंग रोडमुळे नऊ तालुक्यांतील शेतकरी बाधित होणार असल्याने त्यांच्या जमिनी आणि उपजीविकेचा प्रश्न गांभीर्याने विचारात घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.