नागपूर : नागपूरकर भोसले राजघराण्याच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या महाल येथील सिनीयर भोसला पॅलेस येथे यंदाही २९८ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा भक्तिभावाने पार पडली. नागपूर राज्याचे संस्थापक व हिंदवी स्वराज्याचे विस्तारक सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) यांच्या कालखंडापासून, इ.स. १७२८ पासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार सातव्या दिवशी, दशमीला श्री गणेशमूर्तीचे पालखीतून विसर्जन करण्यात आले.
महाल येथील श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या सिनीयर भोसला पॅलेसमध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशमूर्तीला २९८ वर्षांपासून ठरावीक आकार आणि रंगाची परंपरागत सजावट केली जाते. विशेष म्हणजे नागपूरकर भोसलेकालीन सिरपेज-तुरा असलेली पारंपरिक पगडी गणरायाला परिधान केली जाते.
गणेशमूर्तीचे आगमन पालखीतून करण्याची तसेच विसर्जनाच्या दिवशीही गणरायाला पालखीतून नेण्याची परंपरा आजही जपली जात आहे. त्यामुळे या गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजघराण्याच्या या २९८ वर्षांच्या अखंड परंपरेचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त आणि नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने पालखीतून निघालेल्या गणरायाच्या विसर्जन सोहळ्याने यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.